मित्रांनो १ रुपयात मिळणारा पिक विमा योजनेचा लाभ आता बंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना पूर्वी प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत फक्त १ रुपयात पिक विमा मिळत होता. मात्र आता राज्य मंत्रिमंडळाने सुधारित योजना मंजूर केली असून त्यानुसार शेतकऱ्यांना पिक विम्यासाठी अधिक रक्कम भरावी लागणार आहे.
खरीप हंगामातील पिकांसाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के आणि नगदी पिकांसाठी ५ टक्के प्रीमियम शेतकऱ्यांना स्वत: भरावा लागेल. ही सुधारणा २९ एप्रिल २०२५ रोजी राज्य मंत्रिमंडळाने मान्य केली असून त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढणार आहे.
प्रधानमंत्री फसल बिमा योजना २०१६ पासून देशभरात लागू करण्यात आली आहे. या योजनेत केंद्र सरकारने केवळ पिक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई अनिवार्य केली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने त्यात आणखी चार विमा ट्रिगर समाविष्ट केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी न होणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल हवामान आणि काढणीनंतरचे नुकसान यांसारख्या परिस्थितींमध्येही विमा संरक्षण मिळत होते.
या अतिरिक्त संरक्षणामुळे विमा हप्त्याची रक्कम वाढली होती आणि त्यानुसार राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानातही वाढ झाली होती. आता मात्र केवळ पिक कापणी प्रयोग या एकाच निकषावर आधारित भरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित सर्व ट्रिगर बंद करण्यात आले आहेत.
या बदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. विशेषता दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट किंवा काढणी पश्चात हवामानातील बदलांमुळे होणारे नुकसान भरून न निघाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ शकतात.