मंडळी गेल्या दोन दिवसांपासून राज्यात हवामानात लक्षणीय बदल पाहायला मिळत आहेत. ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढलेला असला, तरी तापमानात किंचित घट झाली आहे. 31 मार्च रोजी राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मात्र हलक्या सरी पडल्याचे पाहायला मिळाले.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आगामी काही दिवसांसाठी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत 5 एप्रिलपर्यंत अधूनमधून अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असून, कांदा काढणीला विशेष वेग आलेला आहे. अशा वेळी संभाव्य अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. काही भागांत वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे. मात्र 5 एप्रिलनंतर हवामान काहीसे स्थिर होण्याची शक्यता असून, 11 एप्रिलच्या सुमारास पुन्हा एकदा पावसाचे संकेत मिळत आहेत.
1 ते 5 एप्रिलदरम्यान राज्यात अवकाळी पावसाचे सावट राहणार असल्याने, शेतकऱ्यांनी पिकांची विशेष काळजी घ्यावी. जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि पावसाच्या वेळी झाडांच्या खाली थांबू नये, अशा सूचनाही डख यांनी दिल्या आहेत.