मंडळी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक उपक्रमाअंतर्गत फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) उपलब्ध करून देण्यात येत आहे. जसे नागरिकांसाठी आधार कार्ड आहे, तसेच आता शेतकऱ्यांना शेतीसाठी स्वतंत्र डिजिटल ओळखपत्र मिळणार आहे.
हे ओळखपत्र मिळवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी आणि कार्ड कसे डाउनलोड करावे, याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.
सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीचा मालकी हक्क आहे आणि ज्यांचे नाव सातबारा उताऱ्यावर आहे, अशा शेतकऱ्यांना हे ओळखपत्र मिळणार आहे. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल. शेतीसंबंधित सर्व माहिती या ओळखपत्रात संग्रहित केली जाईल, त्यामुळे शेती विषयक योजनांसाठी अर्ज करणे अधिक सोपे होईल. कागदपत्रांची सतत पूर्तता करण्याची गरज भासणार नाही आणि शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेणे अधिक सोयीस्कर होईल.
ऑनलाईन नोंदणीसाठी, शेतकऱ्यांनी https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. पोर्टल उघडल्यानंतर ‘फार्मर आयडी नोंदणी’ हा पर्याय निवडावा. आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करावा. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अर्जाची स्थिती तपासता येईल.
सध्या शेतकरी स्वता ऑनलाईन नोंदणी करू शकत नाहीत. नोंदणी करण्यासाठी त्यांना सीएससी (CSC) केंद्रावर जावे लागेल. भविष्यात शेतकऱ्यांना स्वतः ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते.
फार्मर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना पोर्टलवर लॉगिन करून कार्ड डाउनलोड करता येईल. तसेच, कार्ड उपलब्ध झाल्यावर त्यांना एसएमएस किंवा ई-मेलद्वारे सूचना दिली जाईल.
जर तुम्ही अजूनही फार्मर आयडी साठी नोंदणी केली नसेल, तर तत्काळ सीएससी केंद्रावर जाऊन नोंदणी करून घ्या आणि शेतकरी ओळखपत्र मिळवा. अधिक माहितीसाठी अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.