नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील सुमारे 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी 2,169 कोटी रुपयांची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा लागत असल्यामुळे या हप्त्याच्या रक्कमेत काहीसा विलंब झाला आहे.
शेतकरी आपला हप्ता जमा झाला आहे की नाही हे मोबाईलवरून घरी बसून सहजपणे तपासू शकतात. त्यासाठी सर्वप्रथम https://nsmny.mahait.org/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागते. त्या पानावर Beneficiary Status या बटनावर क्लिक केल्यावर आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा लागतो.
नंतर कॅप्चा कोड भरून ओटीपी घेतला जातो. तो भरल्यानंतर Get Data या बटणावर क्लिक केल्यावर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात किती हप्ते जमा झाले आहेत, कोणत्या दिवशी किती रक्कम कोणत्या बँकेत जमा झाली आहे याची माहिती स्क्रीनवर दिसून येते. हप्ता मिळाला नसेल तर त्यामागील कारण देखील येथे स्पष्टपणे दिसते.
केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशभर लागू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी 2,000 रुपयांच्या स्वरूपात थेट बँक खात्यात जमा केली जाते.
राज्य सरकारनेही याच पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवलेली आहे. यामध्येही शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांचा लाभ मिळतो. हप्ते मिळण्यात कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र येथे संपर्क साधावा.