मंडळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या रकमेवर अधिकृत मंजुरी दिली आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
1642 कोटींच्या सहाव्या हप्त्याला मंजुरी
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरु केलेल्या या योजनेत आतापर्यंत पाच हप्ते वितरित झाले आहेत. डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीसाठी सहाव्या हप्त्याची रक्कम लवकरच देण्यात येणार आहे.
राज्य सरकारने या हप्त्यासाठी 1642.18 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, यासोबतच आधीपासून उपलब्ध असलेल्या 653.50 कोटी रुपयांचा देखील उपयोग केला जाणार आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2000 रुपये जमा होतील. तसेच, मागील हप्त्यांतून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनाही ही रक्कम दिली जाईल.
91 लाख शेतकऱ्यांना मिळाला लाभ
नमो शेतकरी योजना सन 2023-24 पासून लागू करण्यात आली असून, पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून अतिरिक्त आर्थिक सहाय्य देण्याचा तिचा मुख्य उद्देश आहे. ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेद्वारे 91.45 लाख शेतकऱ्यांना थेट बँक खात्यांमध्ये 9055.83 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
तसेच, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील 117.55 लाख शेतकऱ्यांना 33468.54 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. केंद्र शासनाच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात.
15000 रुपयांचा वार्षिक लाभ
महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान नमो शेतकरी योजनेचे वार्षिक अनुदान 6000 रुपयांवरून 9000 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे पीएम किसानच्या 6000 रुपयांसह नमो शेतकरी योजनेचे 9000 रुपये मिळून शेतकऱ्यांना एकूण 15000 रुपये वार्षिक लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी ही योजना आर्थिक स्थैर्य प्रदान करणारी ठरेल, असे शासनाचे मत आहे. लवकरच सहाव्या हप्त्याची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केली जाईल.