मंडळी केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सर्वांत मोठी आणि महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यावर जमा केले जातात. मात्र या योजनेमध्ये अलीकडेच काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन नियमांची माहिती ठेवणे आवश्यक आहे.
आता या योजनेच्या नोंदणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना अर्ज करताना वैयक्तिक ओळखपत्र अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच फॉर्ममध्ये वैवाहिक स्थितीची नोंद करावी लागणार आहे आणि पती-पत्नी किंवा पालकांची माहिती भरणे देखील आवश्यक केले आहे.
याशिवाय शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची कागदपत्रे आणि मालकीशी संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतील. ही सर्व कागदपत्रे तहसील स्तरावर तपासली जातील आणि मगच अर्ज पुढे मंजुरीसाठी पाठवला जाईल. यामुळे अपात्र अर्जदारांना लाभ मिळण्याची शक्यता कमी होईल.
पीएम किसान पोर्टलवर लॉगिन करताना आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल आणि तो ओटीपी भरल्यानंतरच प्रवेश मिळेल. त्यामुळे अर्ज करताना वापरला जाणारा मोबाईल नंबर आधारशी जोडलेला असणे गरजेचे आहे. जर नोंदणी करताना शेतकऱ्याने चुकीचे राज्य निवडले असेल, तर आता शेतकरी कॉर्नर विभागात जाऊन राज्य बदलण्याची विनंती करता येणार आहे. ही विनंती तहसील व जिल्हा स्तरावर तपासल्यानंतर केंद्र सरकारकडे पाठवली जाईल, त्यामुळे नोंदणीतील चुका लवकर सुधारता येतील.
अर्ज करताना जर कोणतीही माहिती चुकीची दिली गेली असेल, तर शेतकऱ्याचा अर्ज रद्द केला जाईल. तसेच जर चुकीच्या माहितीद्वारे लाभ मिळवला असेल, तर ती रक्कम ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने परत घेतली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे अचूकपणे सादर करावीत.