मंडळी मार्च आणि एप्रिलच्या वाढत्या तापमानासोबत यंदाच्या पावसाळ्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. जागतिक हवामान केंद्रांनी भारतात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविला असला, तरी पंचांगकर्त्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत कमी पावसाचे भाकीत केले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची बचत करणे हे नागरिक आणि प्रशासनासमोर एक मोठे आव्हान असेल.
हवामान खात्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरवर्षी भारतीय हवामान खाते दोन ते तीन टप्प्यांत पावसाचे अंदाज जाहीर करते. त्याचबरोबर काही जागतिक हवामान केंद्रेही फेब्रुवारीपासूनच आपले अंदाज जाहीर करतात. महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकरी हवामान खात्याच्या अंदाजाबरोबरच पंचांग व पारंपरिक पद्धतींच्या अंदाजांवरही विश्वास ठेवतात. भेंडवळच्या घटमांडणीतून अक्षय तृतीयेला पावसाचे भाकीत जाहीर होणार आहे.
मान्सूनचे आगमन
पंचांगकर्त्यांच्या मते, यंदा केरळमध्ये मान्सून ४ जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्रात १६ जूनपासून मान्सून सक्रिय होईल. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता असली तरी एकूण पर्जन्यमान मागील वर्षाच्या तुलनेत कमी असेल. यामुळे एप्रिल आणि मे महिन्यांत पाण्याची बचत करणे आवश्यक ठरणार आहे.
पाच नक्षत्रांमध्ये चांगला पाऊस
पंचांगानुसार, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा आणि हस्त या पाच नक्षत्रांमध्ये समाधानकारक पाऊस होईल. १६ जून ते १५ जुलै आणि २ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच, २० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीतही पाऊस पडण्याचे संकेत मिळाले आहेत. तथापि, काही भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
विशेष खगोलीय घटना
८ जून रोजी बुध-गुरू युतीमुळे काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल, परंतु मृग नक्षत्राचा पाऊस अपेक्षेप्रमाणे न पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि नागरिकांनी पाणी वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.