मित्रांनो राज्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढतच चालला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. काही ठिकाणी ४२ अंशांपर्यंत तापमान पोहोचल्याने जनजीवनावर परिणाम होत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाने एप्रिल अखेरीपर्यंत दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात उष्णता आणि दमट हवामानामुळे नागरिकांच्या हालात भर पडली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दमट वाऱ्यांमुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. मुंबई आणि कोकणातही आर्द्रता वाढल्यामुळे तापमान तुलनात्मकरीत्या थोडेसे कमी असले तरी उष्मा अधिक तीव्रतेने जाणवत आहे. मुंबईत तापमान ३४ ते ३७ अंश सेल्सिअसदरम्यान आहे.
हिमालयात सक्रिय झालेल्या पश्चिमी झंझावातामुळे आणि राजस्थानच्या वायव्य भागात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात वातावरणात काही प्रमाणात बदल होत आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र ते कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. हवामान विभागानुसार, लवकरच पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या कोणत्याही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.
नागरिकांनी गरमीपासून बचावासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. शक्य असल्यास दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. भरपूर प्रमाणात पाणी, लिंबूपाणी, ताक किंवा फळांचे रस घ्यावेत. हलके, सैलसर आणि सूती कपडे घालावेत. उष्माघाताची लक्षणं जसे की डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ जाणवू लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.