नमस्कार मंडळी देशातील सर्व नागरिकांसाठी एकसमान पेन्शन योजना या वर्षाच्या अखेरीस लागू होण्याची शक्यता असून, केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालय यावर अंतिम टप्प्यात काम करत आहे. येत्या काही महिन्यांत या योजनेची रूपरेषा निश्चित केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या योजनेअंतर्गत योगदानकर्त्यांना निश्चित किमान रकमेव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कमही त्यांच्या पेन्शन खात्यात जमा करता येणार आहे. विशेष म्हणजे, असंघटित क्षेत्रातील कामगारांचाही यामध्ये समावेश असेल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्राप्त होऊ शकेल.
पेन्शन खात्यात अतिरिक्त बचत करण्याची सुविधा
उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती दरमहा ३,००० रुपये पेन्शन खात्यात जमा करत असेल आणि त्याच्याकडे एखाद्या वेळी ३०,००० किंवा ५०,००० रुपयांची अतिरिक्त रक्कम उपलब्ध असेल, तर ती रक्कमही त्याला खात्यात जमा करण्याची मुभा असेल. तसेच पेन्शन सुरू करण्याचा कालावधी निवडण्याचाही पर्याय दिला जाणार आहे.
स्वैच्छिक सहभाग—कोणतीही सक्ती नाही
ही योजना पूर्णत स्वैच्छिक असून कोणत्याही व्यक्तीला रोजगार असणे आवश्यक नाही. म्हणजेच, एखादी व्यक्ती जर स्वतःचा छोटा व्यवसाय किंवा दुकान चालवत असेल आणि भविष्यासाठी आर्थिक तयारी करत असेल, तर तीही या योजनेत सहभागी होऊ शकते.
योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे ठेवण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर कोणतीही वयोमर्यादा नसून कोणतीही पात्र व्यक्ती त्यामध्ये सहभाग घेऊ शकते. सद्यस्थितीत मंत्रालय विविध तज्ज्ञ व असंघटित क्षेत्रातील प्रतिनिधींकडून अभिप्राय घेत आहे.
२०३६ पर्यंत भारतातील वृद्धांची संख्या २२ कोटींपर्यंत पोहोचेल, असा अंदाज असून, या पार्श्वभूमीवर ही योजना देशातील वृद्धजनांच्या आर्थिक हितासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.