मंडळी राज्यातील तापमान सतत वाढत असून, प्रखर उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे. रविवारपासून पुढील तीन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
विशेषता चंद्रपूर जिल्हा देशातील सर्वाधिक तापमान नोंदवणारा ठरला आहे. येथे 44.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, शहरातील दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. हवामान खात्याने पुढील दोन दिवसांत तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
विदर्भातील स्थिती
विदर्भातही उष्णतेचा जोर कायम आहे. अकोला (44.3°C), अमरावती (44.4°C), नागपूर (44.0°C) आणि वर्धा (44.0°C) या शहरांमध्ये तापमानाने ४४ अंशाचा टप्पा पार केला आहे. उष्णतेमुळे पाण्याची टंचाई आणि विविध आरोग्य समस्यांमध्ये वाढ झाली आहे. चंद्रपूरमध्ये रात्रीचे तापमानही तुलनेने जास्त असून नागरिकांना आराम मिळताना दिसत नाही.
मराठवाड्यातही उन्हाचा कहर
बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही उन्हाच्या झळांमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. या शहरांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सकाळी आणि संध्याकाळीच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत उकाड्याचा अनुभव
कोकण किनारपट्टीवर तुलनेने कमी तापमान असले तरी, मुंबईत रविवारी तापमान 33.6°C नोंदवले गेले. ही पातळी मागील काही दिवसांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये उकाडा जाणवत आहे. हवामान खात्याने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पुरेसे पाणी पिणे, थंड पेये घेणे आणि गरज असल्यासच बाहेर पडणे यासारख्या खबरदारीच्या उपायांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.