मंडळी सध्या राज्यभर उष्णतेची लाट सुरू असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, हवामानात बदल होत असून काही भागांमध्ये पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत येत्या काही तासांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबईत आज आणि उद्या पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण असून दमट हवेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उष्णतेपासून दिलासा मिळावा, अशी अपेक्षा करत पावसाच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत.
राज्यातील काही भागांत वादळी पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामानातील या बदलांमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात काल (13 एप्रिल) सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. राजापूर आणि पन्हाळसाठे परिसरात गारांचा पाऊस झाल्याने साठवलेला कांदा भिजला आहे. त्याचबरोबर कांदा काढणी सुरू असलेल्या शेतांमध्येही नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.
टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत; दर घसरल्याने मोठे नुकसान
उन्हाच्या तीव्रतेमुळे टोमॅटो पिकाचे नुकसान होत असतानाच, बाजारात दरही घसरले आहेत. टोमॅटोला सध्या पाच ते दहा रुपये किलो दर मिळत असून, यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नाही. बीड जिल्ह्यातील मुळुकवाडी येथील शेतकरी अशोक ढास यांनी टोमॅटो शेतीसाठी दीड लाखांचा खर्च केला होता. मात्र, दर कोसळल्याने त्यांनी टोमॅटो बाजारात विक्रीसाठीच नेले नाहीत. पीक काढण्यासाठी लागणारा २५ हजार रुपयांचा अतिरिक्त खर्चही त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. परिणामी, अशा स्थितीत टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
विदर्भात उष्णतेने विक्रमी पातळी गाठली
विदर्भात तापमान विक्रमी पातळीवर पोहोचले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अकोल्यात तापमान ४४ अंशांवर पोहोचल्याने नागरिक घरातच राहणे पसंत करत आहेत. शहरातील मंदिरांमध्येही उष्णतेचा परिणाम जाणवू लागला आहे. अकोल्यातील टिळक रोडवरील मोठ्या राम मंदिरात गजानन महाराजांच्या मूर्तीला थंडावा देण्यासाठी विशेष कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. हे दृश्य पाहून नागरिक म्हणतात, विक्रमी उष्णतेपुढे आता देवालाही कुलर लागतोय