नमस्कार शेतकरी मित्रांनो डिसेंबर ते एप्रिल हा तुरीच्या विक्रीचा प्रमुख हंगाम असतो. मार्च २०२५ मध्ये तुरीची आवक सुमारे ९.३ लाख टन इतकी झाली आहे, जी मागील वर्षीच्या १२ लाख टन आवकेच्या तुलनेत कमी आहे. तूर हे खरीप हंगामातील पीक असून त्याची पेरणी जून ते जुलैमध्ये तर काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत केली जाते.
भारत सरकारने जाहीर केलेल्या अंदाजानुसार २०२४-२५ मध्ये देशात तुरीचे उत्पादन सुमारे ३५.०२ लाख टन होईल, जे मागील वर्षाच्या तुलनेत जास्त आहे. महाराष्ट्रातही उत्पादन वाढण्याची शक्यता असून, २०२३-२४ मध्ये १०.१० लाख टन उत्पादन झाले होते, तर २०२४-२५ मध्ये ते १२.६० लाख टनांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.
नोव्हेंबर २०२४ पासून तुरीच्या किंमती घसरत आहेत. मागील तीन वर्षांतील एप्रिल महिन्यातील सरासरी दर अनुक्रमे ६१९२ रुपये (२०२२), ८४१४ रुपये (२०२३), आणि १००७१ रुपये (२०२४) प्रति क्विंटल इतके होते. एप्रिल २०२५ मध्ये तुरीचे दर सुमारे ४७०० ते ७१०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सध्याचे दर हे सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा म्हणजेच ७५५० रुपयांपेक्षा कमी आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत तुरीच्या आयातीत घट आणि निर्यातीमध्ये वाढ झाली आहे.
सोयाबीनच्या बाबतीत, अमेरिकन कृषी विभागाच्या २०२५ च्या मार्च अहवालानुसार, २०२४-२५ मध्ये जागतिक पातळीवर सुमारे ४२०७ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे, जे २०२३-२४ च्या ३९४९ लाख टन उत्पादनाच्या तुलनेत ६.४ टक्के अधिक आहे. तरीही मार्च महिन्यात भारतात सोयाबीनची मासिक आवक कमी झाली आहे.
२०२३-२४ मध्ये सोयापेंडच्या निर्यातीत वाढ झाली असून, एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत १९.४० लाख टन निर्यात झाली आहे, जी मागील वर्षाच्या १९.३४ लाख टन निर्यातीपेक्षा थोडी अधिक आहे.
सरकारने २०२४-२५ हंगामासाठी सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत ४८९२ रुपये प्रति क्विंटल जाहीर केली आहे. मात्र सध्याचे बाजारभाव हे त्यापेक्षा कमी असून, एप्रिल २०२५ मध्ये सोयाबीनचे दर ४००० ते ४४०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मागील तीन वर्षांतील एप्रिलमधील सरासरी किंमती अनुक्रमे ७२८९ रुपये (२०२२), ५१५२ रुपये (२०२३), आणि ४५९६ रुपये (२०२४) प्रति क्विंटल होत्या. यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराच्या स्थितीकडे लक्ष देत योग्य वेळी विक्री करण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.