मंडळी राज्यात उष्णतेची लाट असून तापमान 44 अंशांच्या वर पोहोचले आहे. याच दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 22 एप्रिल रोजी हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
सोलापूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा कायम आहे. आजचा कमाल तापमान 42 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. सोलापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण जिल्हा आहे, आणि पुढील आठवडाभर तापमान 42 अंशांच्या वर राहण्याची शक्यता आहे. आज दुपारनंतर सोलापुरातील आकाश ढगाळ होऊन हलक्या पावसाची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातही उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. मागील 24 तासात पुण्यात कमाल तापमान 38.7 अंश आणि किमान तापमान 20 अंश सेल्सियस नोंदवले गेले. पुढील 24 तासांत पुण्यात तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, आणि आकाश निरभ्र राहील.
सातारा जिल्ह्यात उष्म्याचा जोर कायम आहे. गेल्या 8 दिवसांपासून साताऱ्यात तापमान 41 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते, आणि पुढील 8 दिवसांपर्यंत हे तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे. आज साताऱ्यात कमाल तापमान 40 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. आकाश निरभ्र राहील.
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासांत ढगाळ हवामानामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 35.8 अंश सेल्सियस होते. पुढील 24 तासांत तापमान 39 अंश सेल्सियसपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, आणि दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यात पुढील 24 तासांत किमान तापमान 24 अंश सेल्सियस आणि कमाल तापमान 39 अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. सांगलीत 38.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
वर्षाच्या या उष्णतेच्या लाटेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपिकांची काळजी घ्यावी लागेल, तसेच नागरिकांना आरोग्याची दक्षता घेणे आवश्यक आहे.