मंडळी महाराष्ट्रात सध्या तापमानात सतत वाढ होत असून हवामानातील अचानक होणारे बदल नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी मोठी चिंता निर्माण करत आहेत. दक्षिणेकडील समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ महाराष्ट्राला थेट धडकणार नसले तरी त्याचा प्रभाव राज्यातील हवामानावर जाणवत आहे.
दिवसा प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असताना संध्याकाळी वाऱ्याचा वेग, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. यामुळे आंबा, काजू, द्राक्ष आणि संत्र्यासारख्या फळपिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरण्याची वेळ आली असून अवकाळी पाऊस त्यांच्या अर्थकारणावर गंभीर परिणाम करू शकतो.
हवामान विभागाचा इशारा — आठ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाने महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 29 आणि 30 मार्च रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील, मात्र पावसाची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत गारवा जाणवेल, तर घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूरमध्येही हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
तापमानवाढ कायम— उष्णतेची तीव्रता वाढणार
गेल्या 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत तापमानात अधिक वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी येथे हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. इतर भागांत वातावरण कोरडे राहील आणि उष्णतेची तीव्रता अधिक जाणवेल.
सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी हवामान बदलांकडे लक्ष देत आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांनीही पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे.