मंडळी देशात हवामानाच्या विविध रूपांचा अनुभव येणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. दक्षिण भारतात कमी दाबाचा पट्टा आणि तीव्र वाऱ्यांचे क्षेत्र निर्माण होत असताना, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र होत आहे. विशेषता राजस्थान, दिल्ली आणि मध्य प्रदेशमध्ये तापमान झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातही उष्णतेची तीव्र झळ जाणवत असून, विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील २४ तासांचं हवामान कसं असणार?
भारतीय हवामान विभागानुसार, पुढील २४ तासांत दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूच्या दक्षिण भागात आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याउलट उत्तर आणि मध्य भारतात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढतेय
महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत चालली आहे. अकोला येथे सर्वाधिक ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतही प्रखर ऊन जाणवत आहे.
विदर्भात यलो अलर्ट
उष्णतेमुळे बाष्पीभवन प्रक्रिया वेगाने होत असून, त्यामुळे वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता वाढली आहे. हवामान विभागाने विदर्भात पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्याच्या इतर भागांत आकाश अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील हवामान बदलाचा परिणाम महाराष्ट्रावरही होत असून, राजस्थानपासून विदर्भाच्या वायव्य भागापर्यंत पावसाचे ढग तयार होत आहेत. त्यामुळे काही भागांमध्ये हवामान अचानक बदलण्याची शक्यता आहे.